रायगड, दि. ५ (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील संघर्ष आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या मानापर्यंत पोहोचला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा टोकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आजवर आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता, मात्र यंदा शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार भरत गोगावले यांना हा सन्मान मिळावा, अशी ठाम मागणी केली आहे. यामुळे १५ ऑगस्टच्या आधीच दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा जोरदार संघर्ष उफाळण्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना नेत्यांची एकमुखी मागणी – “गोगावलेंनाच पालकमंत्रिपद व ध्वजारोहणाचा मान”
शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भरत गोगावले यांना ध्वजारोहणाचा मान व पालकमंत्रिपद मिळावं, अशी उघड भूमिका घेतली असून, या मागणीला राज्यमंत्री आशिष जैसवाल यांनीही दुजोरा दिला आहे. “भरत गोगावले हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे रायगडचा पालकमंत्री पदभार द्यावा,” अशी मागणी जैसवालांनी स्पष्टपणे मांडली आहे.
गोगावले यांचा दावा – “१५ ऑगस्टपूर्वी पालकमंत्री नियुक्त होईल”
यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी, “पालकमंत्रिपदाचा तिढा १५ ऑगस्टपूर्वी सुटेल, आणि मलाच रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी माझी अपेक्षा आहे,” असं स्पष्ट सांगितलं. यामुळे आता या पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच!
पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये कोणताही गट माघार घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही, त्यामुळे हा तिढा आणखी गुंतागुंतीचा होतो आहे. याशिवाय आता ध्वजारोहणाचा प्रश्नही त्यात भर टाकतो आहे, ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.