विनायक पाटील
पेण : मुंबई येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमात रायगड जिल्हा भाजपचे सरचिटणीस वैकुंठ पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये विशेषतः गोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रवक्ते बापूसाहेब सोनगिरे यांचा समावेश आहे. ते माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले असून, माणगाव तालुक्यातील संजय गांधी योजना अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदर्श मानत त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांच्यासह मुकुंद पांडुरंग जांबरे (न्हावे, राष्ट्रवादी काँग्रेस विभाग प्रमुख), प्रदीप सिडकोजी गोरेगावकर (गोरेगाव, माजी शिवसेना शहरप्रमुख), अमोल गोविंद पवार (गोरेगाव, माजी मनसे विभागप्रमुख), अनिकेत प्रकाश महामुनकर (भिरा, काँग्रेस), अनिल केशव महाडिक (पन्हळघर, माजी शिवसेना कार्यकर्ते), मंदार सुनील महामुनकर (गोरेगाव, माजी मनसे कार्यकर्ते) या सर्वांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला बळकटी दिली.
या वेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “भाजपमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष पाठीशी उभा राहील आणि त्यांना योग्य मान-सन्मान मिळेल, याची खात्री आहे.”