उरण (प्रतिनिधी) : उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, तसेच सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री. जे. एस. घरत (वय ८२) यांचे सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सातरहाटी (उरण) येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकार, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
श्री. घरत यांनी आपल्या कार्यकाळात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे सहसचिव, अखिल आगरी समाज परिषदेचे आजीव सदस्य, ‘आगरी दर्पण’ मासिकाचे उपसंपादक, तसेच हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील ग्रंथालय व वाचनालय, पनवेल संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
शासकीय सेवेतही त्यांनी उरण पंचायत समितीत पंचायत विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत राहून, ग्रामविकास आणि समाजहिताचे कार्य प्रामाणिकपणे केले. पत्रकारितेबरोबरच समाजसेवेतील त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी ठरले.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेला आदर्श, संयमी व शिस्तबद्ध नेतृत्व दिले. त्यांच्या जाण्याने पत्रकार संघाने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे.