वैभव कळस
म्हसळा : तालुक्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या सलग दोन घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका घटनेत ७६ वर्षांची वृद्ध महिला, तर दुसऱ्या घटनेत २८ वर्षांची विवाहित महिला आणि तिची ८ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद घेतली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला महादेव पवार (वय ७६) या महिला २९ जुलै २०२५ पासून बेपत्ता आहेत. त्या तोराडी आदिवासीवाडी (ता. म्हसळा) येथील रहिवासी असून, अंगाने सडपातळ, उंच, गोऱ्या वर्णाच्या आहेत. बेपत्ता होताना त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली होती.
दुसऱ्या घटनेत, प्रिया प्रसाद तांबडे (वय २८) आणि तिची मुलगी वेदा प्रसाद तांबडे (वय ८) या दोघी ९ जून २०२५ पासून त्यांच्या लेप (ता. म्हसळा) येथील राहत्या घरातून बेपत्ता आहेत. प्रिया तांबडे या गोऱ्या वर्णाच्या, अंगाने सडपातळ, उंची ५ फूट आहेत. तर मुलगी वेदा हिची उंची ३ फूट असून ती देखील सडपातळ व गोऱ्या वर्णाची आहे. या घटनेबाबत प्रियाचे पती प्रसाद तांबडे (वय २८) यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तीनही व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास, त्वरित म्हसळा पोलीस ठाणे (दूरध्वनी क्रमांक – ०२१४९-२३२२४०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन म्हसळा पोलिसांनी केले आहे.