प्रतिनिधी
अलिबाग : नुकत्याच झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका शाखेच्या सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये रमेश प्रभाकर धनावडे यांची अलिबाग तालुका शाखा अध्यक्ष म्हणून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या अगोदर रमेश धनावडे यांनी अलिबाग तालुका प्रतिनिधी व जिल्हा कार्यकारणीवर काम केले होते. रमेश धनावडे यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
सदर सभेमध्ये कोमसाप माजी अध्यक्षा सुजाता पाटील यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मागील कार्यकारिणीने केलेल्या भरीव कार्याचा त्यांनी आढावा घेतला व सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. त्यानंतर नियुक्त निवडणूक अधिकारी निर्मला फुलगावकर व नंदू तळकर यांच्या देखरेखीखाली निवडणूक अतिशय सौहार्दाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर निवडणूकीत शाखेचे नवनियुक्त कार्यकारिणी एकमताने कायम केली गेली. यामध्ये उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, जिल्हा प्रतिनिधी नंदू तळकर, सचिव वैशाली भिडे, सहसचिव दिप्ती कुलकर्णी, खजिनदार नागेश कुलकर्णी, युवाशक्ती प्रमुख गायत्री तुळपुळे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून वर्षा दिवेकर, रविंद्र थळे, ॲड. नीला तुळपुळे, वर्षा कुवळेकर, स्नेहल आम्ब्रे, सागर नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निर्मला फुलगावकर, सुजाता पाटील, डॉ चंद्रकांत वाजे, संध्या कुलकर्णी हे सदस्य सल्लागार समितीवर राहून मार्गदर्शन करतील. या संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध व एक मताने झाली. सर्व नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचे पुष्प देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
कोमसाप अलिबाग शाखा ही साहित्य क्षेत्रात नावलौकिक कमावलेली संस्था असून संस्थेचा नावलौकिक कायम राखण्याचा व प्रगतीचा आलेख उंचावत नेण्याचा मनोदय शाखाध्यक्ष रमेश धनावडे यांनी व्यक्त केला.