गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील ३० वर्षीय भावेश नरेंद्र पोवळे यांचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये पैसे काढताना विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भावेश पोवळे घरातून दिघीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममध्ये गेले. सुमारे पावणे सात वाजता एटीएमचा दरवाजा उघडताच त्यांना जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना दिघी येथून बोर्लीपंचतनमधील खाजगी रुग्णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर गावात व तालुक्यात शोककळा पसरली आहे. एटीएम व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित व्यवस्थापकावर भारतीय दंड संहिता कलम 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच, विद्युत अपघातांमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पोवळे कुटुंबातील आई व भावाचा एकमेव आधार हरपल्याने गावकऱ्यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
