• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरे यांना; भरत गोगावले यांना पुन्हा धक्का

ByEditor

Aug 11, 2025

रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; राजकीय चर्चांना ऊत

अमुलकुमार जैन
रायगड :
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन दहा महिने उलटले तरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शिवसेना (शिंदे गट) रोहयो मंत्री भरत गोगावले यांना हे पद मिळावे अशी मागणी त्यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांची आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांची इच्छा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या जिल्ह्याच्या पालकमंत्री व्हाव्यात अशी आहे.

दरम्यान, रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना अजूनही कायमस्वरूपी पालकमंत्री नाहीत. महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर जाहीर यादीत रायगडसाठी अदिती तटकरे व नाशिकसाठी गिरीश महाजन यांची नावे होती. मात्र, अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर भरत गोगावले समर्थकांनी आक्रमक आंदोलन केले आणि दोन दिवसांतच नियुक्ती रद्द करण्यात आली. तरीही प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांनाच मिळाला होता.

शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यातील जिल्ह्याच्या नेतृत्वाचा वाद अनेक वर्षांपासून सुरूच आहे. हा वाद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुटला नाही आणि सध्याही (फडणवीस मुख्यमंत्री असतानाही) तो कायम आहे.

राज्य सरकारच्या ११ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकानुसार, येत्या १५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण अदिती तटकरे करतील. नाशिकमध्ये मात्र गिरीश महाजन झेंडावंदन करतील.

राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाली आहे की, यामुळे पालकमंत्रीपदाची माळ अदिती तटकरे यांच्या गळ्यात पडणार का? तरी अदिती तटकरे किंवा भरत गोगावले यांची याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अलिबाग-मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांनी मात्र सांगितले की, “स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना देण्यात आला असला तरी, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच असतील असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लवकरच गोगावले यांची अधिकृत घोषणा होईल.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!