निजामपूर बाजारपेठेत झालेल्या अपघातामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर
सलीम शेख
माणगाव : आंतरराष्ट्रीय दिघी–बेंगळुरू महामार्गावरील माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठ सध्या वाढत्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहे. अरुंद रस्त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना प्रत्येक वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका सतावत असतो. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व्हावे, अशी नागरिकांची मागणी असून, यासाठी आंदोलक पवित्रा घेण्याची तयारी सुरू आहे. हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे.
अलीकडेच निजामपूर बाजारपेठेत पुण्याकडून कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या कारने एका इसमाला ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेसह या मार्गावरील अनेक गावांचा हा मुख्य रस्ता असून, त्याची भौगोलिक व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे.
पुणे, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात याच मार्गाने येतात. विशेषतः सणासुदीच्या काळात वाहतुकीचा ताण इतका वाढतो की अरुंद रस्त्यावरून जाणे हे वाहनचालकांसाठी मोठी कसोटी ठरते. परिणामी, गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, “महामार्गाचे महत्त्व मान्य आहे; पण बाजारपेठेतील हा जीवघेणा अरुंद भाग कधी रुंद होणार?” शासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा ते देत आहेत.
नुकत्याच झालेल्या अपघातानंतर परिसरातील नागरिक, दुकानदार व प्रवाशांनी मिळून रस्ता रुंदीकरणाची मागणी केली. प्रशासनाकडून आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात काम न झाल्याने नाराजी वाढत आहे. “फक्त आश्वासनांनी जीव वाचणार नाही; रस्त्याची रुंदी वाढवावी लागेल,” असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निजामपूर बाजारपेठेतील हा प्रश्न केवळ स्थानिक मर्यादेत नाही, तर कोकणाकडे जाणाऱ्या असंख्य पर्यटकांच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असला तरी त्याची विद्यमान अवस्था कोकणातील पर्यटनालाही फटका देऊ शकते. शासन, महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून तातडीने पावले उचलल्यासच जीवितहानी रोखता येईल. अन्यथा, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, यात शंका नाही.
