गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील सिध्दी विनायक नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात या मार्गावरून जाणे पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असून, दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
बोर्लीपंचतन शहरातून कोंडेपंचतन गावाकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. याच मार्गावर कोंडेपंचतन धरण असून, तेथूनच शहराला पाणीपुरवठा होतो. अलीकडे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले. मात्र, दोन्ही कामे घाईघाईत व अपूर्ण राहिल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला आहे.
पावसाळ्यात हा चिखल तुडवत जाण्यामुळे पाय घसरून अपघातांची शक्यता वाढली आहे. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत आहे. स्थानिकांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
