विनायक पाटील
पेण: बळवली ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नं. ८२/अ/१, २, ३, ४ या भूखंडांमध्ये झालेल्या उत्खनन प्रकरणी आणि संबंधित ग्रामसेविका शितल जाधव यांच्या भूमिकेवर कारवाईची मागणी करत दोन महिन्यांपासून पाठपुरावा करणारे बळीराम पदम पाटील यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली.
पाटील यांनी सांगितले की, २३ जून २०२५ पासून त्यांनी पंचायत समिती पेण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग, तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तक्रारी दिल्या. मात्र ग्रामसेविका शितल जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बळीराम पाटील यांच्या मते, बळवली ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नं. ८२/अ२ या जमिनीत भरत चांगू ठाकूर (रा. करंजाडे, पनवेल) यांनी हिरामण चांगू सुर्वे यांच्या मालकीच्या जमिनीवर खडी मशीन व गोडाऊन बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडे नाहरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. ग्रामसेविका शितल जाधव यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्ण पडताळणी न करता काही अटी-शर्तींसह नाहरकत दाखला दिला.
पाटील यांच्या मते, प्रत्यक्षात सर्वे नं. ८२/अ हा एकच सातबारा असून त्यात १, २, ३, ४ असे स्वतंत्र तुकडे पडलेले नाहीत. २४ जून २०२४ च्या नकाशानुसारही हा सातबारा आजतागायत ‘जिवंत’ नाही. अशा परिस्थितीत ९ जून २०२३ रोजी नाहरकत दाखला देणे ही शासन व ग्रामस्थांची फसवणूक आहे, असे पाटील यांनी सांगितले.
त्यांनी हेही निदर्शनास आणले की, नाहरकत दाखला हा खडी मशीन व गोडाऊन उभारण्यासाठी होता, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी उत्खनन झाले आहे. या उत्खननाबाबत पेण तहसील कार्यालयाने सामाईक सर्वे नं. ८२/अ वर स्वामित्वकर आकारला असल्याचीही पाटील यांची माहिती आहे.
या प्रकरणात नाव आलेल्या हिरामण चांगू सुर्वे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, “माझ्या मालकीच्या सर्वे नं. ८२/२चा ‘अ’ भागासाठी २०२३ साली ग्रामपंचायत बळवलीकडून नाहरकत दाखला घेतला होता. मात्र त्या जागेत आजपर्यंत कोणतेही माती उत्खनन झालेले नाही आणि ज्या धंद्यासाठी एनओसी घेतली होती, तो व्यवसाय सुरू न झाल्याने एनओसी रद्दबातल झाली आहे. आमच्या सातबाऱ्याची आकारफोडही झाली आहे, त्यामुळे केलेले आरोप निराधार आहेत.”
बळीराम पाटील यांनी शासनाला इशारा दिला आहे की, १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग येथे ते आमरण उपोषणास बसणार आहेत. संबंधित ग्रामसेविकेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.