• Sat. Aug 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पालकमंत्री म्हणजे सत्तेचा मलिंदा – तटकरेंवर महेंद्र थोरवे यांचा हल्ला

ByEditor

Aug 14, 2025

माणगाव शिवसेना महाविजय निर्धार मेळाव्यात ज्ञानदेव पोवारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

सलीम शेख
माणगाव :
“पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा” अशी उपरोधिक व्याख्या खासदार सुनील तटकरेंवर टीका करताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. रायगड जिल्ह्याला लुटणारे, शासकीय जमिनी ताब्यात घेणारे तटकरे आता शिवसेनेवर टीका करत आहेत. “शिवसेना ही ठाकरेंची खासगी मालमत्ता नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. जो हा विचार पुढे नेतो, तोच खरा शिवसैनिक,” असे थोरवे म्हणाले. त्यांनी पुढे इशारा देत सांगितले, “रायगडला औरंगजेबाची छावणी बनवण्याचा प्रयत्न झाला, तर मी हा गड पुन्हा शिवसैनिकांचा दुर्ग केल्याशिवाय शांत बसणार नाही.”

बुधवार, १३ ऑगस्ट रोजी माणगाव शहरातील गांधी मेमोरियल हॉल येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवारांसह शेकडो कार्यकर्त्यांनी ना. भरत गोगावले व आ. महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाला संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, ज्येष्ठ नेते विजय सावंत, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, महिला जिल्हाप्रमुख निलीमा घोसाळकर, तालुका प्रमुख महेंद्र मानकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गोगावले यांचा तिखट प्रहार

ना. भरत गोगावले म्हणाले, “माणगाव शहराची जबाबदारी आम्ही स्वीकारली आणि नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणली. विकासकामांसाठी निधी दिला. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील काही नेत्यांनी अडथळे निर्माण केले, तरी मी 26,215 मतांनी निवडून आलो. गरिबांना फसवणारे, जागा-जमिनी लुटणारे आम्ही नाही. राजीव साबळे यांचा हा चौथा पक्षप्रवेश आहे. त्यांनी वडिलांचे नाव कलंकित केले. पैशाच्या लाचारीसाठी त्यांनी आपल्या आईचे नाव कॉलेजवरून काढले. अशा लोकांची अवस्था भविष्यात बिकट होईल.”

गोगावले यांनी पुढे सांगितले की, “मुंबई-गोवा महामार्गाचे उरलेले काम लवकरच सुरू होईल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चारही जागा आम्ही जिंकणार. काही जणांनी ‘जिंकलो नाही तर तोंड दाखवणार नाही’ असे सांगितले आहे. त्यांना काळे फासण्याची वेळ आम्ही आणू. तटकरेंनी पाठ फिरवली तर राजीव साबळे भाजपात जातील.”

प्रमोद घोसाळकरांचे आव्हान

जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर म्हणाले, “सुनील तटकरेंना आम्ही निवडून दिले. त्यांनी राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढवावी. आगामी निवडणुकांमध्ये सर्व जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे.”

या मेळाव्यात डॉ. परेश उभारे, नितीन दसवते, अनिल सोनार, मनोज पवार, प्रवीण बागवे, बामणोली सरपंच सुवर्णा सकपाळ, माजी सरपंच बाबू पाखुर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!