घन:श्याम कडू
उरण : १५ वर्षांपासून नगरपरिषदेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे, आणि कोविड महामारीत प्राणाची बाजी लावून सेवा बजावणारे आदिवासी, दलित, गोरगरीब सफाई कंत्राटी कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत.
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समिर जाधव यांनी दहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द पाळला नाही. कामगारांच्या हक्कांच्या मागण्या फक्त कागदावरच राहिल्या त्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण आजपासून म्हणजे शुक्रवार, दि.14 ऑगस्टपासून सुरू आहे. “पोटाची खळगी भरण्याऐवजी आम्हाला उपाशी ठेवण्याचा कट सुरू आहे” अशा संतप्त भावना व्यक्त करत, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन तर्फे आज १४ ऑगस्ट २०२५ पासून उरण नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाचा बिगुल वाजवण्यात आला आहे.
“स्वच्छता दूतांना तुम्ही दुर्लक्षित केलंत, तर आम्ही गप्प बसणार नाही. पोटाची भूक पेटली की आंदोलनाची ज्वाला भडकते अशी संतप्त प्रतिक्रिया उपोषणाला बसलेले कामगार व्यक्त करीत आहेत. युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या लढ्याने उरण नगरपरिषद प्रशासनाची झोप उडाली आहे.
याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
