पुरुषांसोबत महिला गोविंदा पथकांचाही थरार पाहायला मिळणार
प्रतिनिधी
नागोठणे : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या गोपालकला सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी होणारा दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा नागोठण्यात प्रथमच वैकुंठ पाटील मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा १६ ऑगस्ट रोजी बस स्टँड परिसरात रंगणार आहे.
दहीहंडी फोडण्याचा थरार, उंच मानवी मनोऱ्यांचा खेळ आणि प्रेक्षकांच्या जीवाचा उडालेला थरार—हे सारे क्षण डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. साहस आणि एकजुटीचा संगम असलेल्या या खेळाला खऱ्या अर्थाने ‘वीरांचा खेळ’ मानले जाते.
उत्सवातील आकर्षण
या दहीहंडी उत्सवात बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. मुख्य बक्षीस म्हणून रु. १,११,१११ रोख रक्कम व आकर्षक चषक ठेवण्यात आला आहे. तसेच विशेष सलामी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत—
पुरुष पथकासाठी सलामीच्या ६ थरांना रु. ५,००० रोख
महिला पथकासाठी सलामीच्या ४ थरांना रु. ४,००० रोख
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांसोबत महिला गोविंदा पथकांनाही यंदा आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित आणि साहसी गोविंदा पथके नागोठणे शहरात दाखल होणार असल्याने वातावरणात उत्सुकता आणि उत्साह दोन्ही भरून राहिले आहेत.
तयारी अंतिम टप्प्यात
उत्सव यशस्वी करण्यासाठी वैकुंठ पाटील मित्र मंडळाचे सर्वेसर्वा, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू आहे. तयारीत भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, भाजप रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे.
१६ ऑगस्ट रोजी नागोठणेकर आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना साहसी गोविंदांचा थरार, महिला पथकांची कला आणि रोख बक्षिसांच्या स्पर्धेचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
