प्रतिनिधी
अलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय चालू आर्थिक वर्षात शंभर कोटीने वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. उत्तर रायगडात आदर्श पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार, अशी घोषणा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहात मंगळवारी (दि. 8 ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी आदर्शचे अध्यक्ष अभिजित पाटील होते. आदर्शचे संस्थापक सुरेश पाटील, आदर्शचे उपाध्यक्ष कैलास जगे तसेच सर्व संचालक सभेला उपस्थित होते. 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सदस्यांची देखील विक्रमी उपस्थिती होती.
संस्थेच्या भागधारकांना सलग चौथ्या वर्षी 11 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. आदर्श पतसंस्थेमध्ये शून्य टक्के एनपीए आहे. एक टक्क्याच्या आत ग्रॉस एनपीए आहे. सन २०२२-२३ या वर्षात 53 कोटी 46 लाख रूपयांनी ठेवींमध्ये वाढ झाली. ठेव वाढीचे प्रमाण 21.43 टक्के आहे. संस्थेच्या ठेवी 302 कोटी 92 लाख रूपयांच्या आहेत. कर्ज वाटप 31 कोटी 64 लाख रूपयांनी वाढले असून एकूण 205 कोटी 16 लाख रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकत्रित व्यवसाय 508 कोटी 8 लाख रूपये आहे. 133 कोटी 6 लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या सभेत सभासदांना दिली.
संस्थेने 508 कोटी रूपयांचा व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात 620 कोटी रूपये व्यवसायाचा टप्पा ओलांडण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे अध्यक्षांनी सांगितले.