अमूलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवादरम्यान तब्बल ५२ गोविंदा-गोपिका जखमी झाले असून यामध्ये १७ गोपिकांचा समावेश आहे. यापैकी १२ जण जिल्हा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत.
१६ ऑगस्ट संध्याकाळपासून १७ ऑगस्ट दुपारीपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, दहीहंडी फोडताना थरावरून कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले. जिल्ह्यात उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला असला तरी या अपघातामुळे उत्सवाला गालबोट लागले.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ४० रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सहा गोविंदा आणि सहा गोपिका दाखल आहेत. जखमींना डोक्याला मार, हाडांचे किरकोळ फ्रॅक्चर, ट्रॉमा, चक्कर येऊन पडणे, ओठावर जखम आदी दुखापती झाल्या आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक सतर्क ठेवण्यात आले होते. अलिबाग शहरात प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित शे.का.प.ची मानाची हंडी आणि महेश मोहिते आयोजित भाजपची दहीहंडी येथे स्वतंत्र आरोग्य पथक कार्यरत होते.
जखमींचा आकडा अलिबाग शहर व तालुक्यातील ४९ तर मुरुड, रोहा आणि पेण तालुक्यातील प्रत्येकी एक असा आहे. वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यामुळे गंभीर अपघात टळल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांनी सांगत जिल्हा रुग्णालयाच्या सेवकांचे आभार मानले.
