“गुन्हेगारांची गय नाही” –पो. नि. सोमनाथ लांडे
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथे मांडवा सागरी पोलिसांनी छापा टाकून २३५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करत एकास अटक केली आहे. जप्त साठ्याची किंमत सुमारे १९ हजार ५२० रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरसुरे–बामणसुरे रोडवरील म्हात्रे पोल्ट्रीसमोर मोकळ्या जागेत अवैधरित्या दारू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी वसंत पांडुरंग म्हात्रे (७५, रा. आगरसुरे) याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी पोलीस शिपाई सौरभ पाटील यांनी फिर्याद दिली असून, मांडवा पोलीस ठाण्यात गु.र. नं. १०५/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ह. ए. व्ही. करावडे करत आहेत.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू आहे.
“अवैध धंद्यांवर कुठलीही गय केली जाणार नाही. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.”
-सोमनाथ लांडे
पोलीस निरीक्षक, मांडवा सागरी पोलीस ठाणे
