पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. बिहारमधील पाटणा येथे आजपासून त्यांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’ ला सुरुवात झाली असून, या यात्रेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा व मतचोरी झाल्याचा दावा केला. या आरोपामुळे राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे म्हटलं की, महाराष्ट्रातील सर्व ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचं दिसत होतं. लोकसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीने चांगले यश मिळवलं होतं. परंतु, अवघ्या चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने विजय मिळवला. हा पराभव केवळ जनतेच्या मतांमुळे झाला नसून यात मोठा घोटाळा झाला, असा ठपका त्यांनी ठेवला.
राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही चौकशी केली असता असे समोर आले की, लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने जादूने तब्बल एक कोटी नवे मतदार तयार केले. हे निव्वळ संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोळ घालण्यात आला आहे.”
तसेच, त्यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप करताना म्हटलं की, भाजप नेते पत्रकार परिषद घेतात तेव्हा आयोगाकडून कोणतेही शपथपत्र मागितले जात नाही. परंतु काँग्रेसकडून दिलेल्या आकडेवारीसाठी मात्र शपथपत्र मागण्यात आले. “तेच आकडे, त्यांचाच डेटा आणि तरीही माझ्याकडून शपथपत्राची मागणी केली जाते. आम्ही सीसीटीव्ही व्हिडीओग्राफीची मागणी केली, पण आयोगाने त्यास नकार दिला. मी देशाला सांगतो की, आज भारतभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका चोरी केल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेतली. आयोगाने स्पष्ट केले की, सर्व राजकीय पक्षांची नोंदणी एकाच प्रक्रियेतून केली जाते आणि कोणत्याही पक्षाशी भेदभाव केला जात नाही. “निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत. राहुल गांधी ‘मतचोरी’सारखे शब्द वापरून देशातील मतदारांमध्ये गोंधळ व अविश्वास निर्माण करत आहेत. हा शब्दप्रयोग हा संविधानाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे,” असे निवडणूक आयोगाने ठणकावून सांगितले.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधींची ‘मतदार अधिकार यात्रा’ बिहारमधून सुरू झाली असली तरी तिचा मुख्य उद्देश राष्ट्रीय स्तरावर मतदारांना एकत्रित करणे आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे हा आहे. काँग्रेसकडून सतत महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित बदलाचा मुद्दा पुढे आणला जात आहे, तर भाजप व महायुतीकडून राहुल गांधींचे आरोप फेटाळले जात आहेत.
विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या विषयावर राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाने मात्र आपली भूमिका स्पष्ट करत राहुल गांधींना इशारा दिला आहे की, निवडणूक प्रक्रियेबद्दल चुकीचे विधान केल्यास त्याविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल.
