अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रेवदंडा आगरकोट किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडला आहे. किल्ल्याच्या सातखणी बुरुजाचा भाग अचानक कोसळून पुणे येथील महिला पर्यटक गंभीर जखमी झाली. अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३) असे जखमी महिलेचे नाव असून, त्या आपल्या पतीसह पर्यटनासाठी रायगडात आल्या होत्या.
स्वातंत्र्यदिन व दहीहंडीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच पुण्याचे देशपांडे दांपत्य नागाव येथे वास्तव्यास होते. रविवारी ते आगरकोट किल्ल्याची सफर करत असताना दुर्दैवी घटना घडली. फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली बॅग आणण्यासाठी अबोली देशपांडे गेल्या असता, वरचा सिमेंटचा भाग कोसळून त्यांच्या डोक्यावर पडला.
घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून, कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुज दुरुस्ती, धोकादायक ठिकाणी ‘डेंजर बोर्ड्स’ लावणे आणि पर्यटकांसाठी सुरक्षितता उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुरातत्त्व विभाग व राज्य शासन जाणूनबुजून या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. काहींच्या मते, “आगरकोट किल्ल्याचे संरक्षण न करता, त्याला नकाशावरून व गुगलवरून गायब करण्याचा डाव सुरू आहे. बिल्डर लॉबीच्या दबावाखाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न चालू आहे,” अशीही चर्चा रंगली आहे.
संतप्त नागरिकांची मागणी
अपघातानंतर स्थानिक नागरिक व पर्यटकांनी केंद्र व राज्य सरकारकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री आशिष शेलार यांच्याकडे आगरकोट किल्ल्याचे संरक्षण करून ऐतिहासिक वारसा वाचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
