क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व आमदार रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशनच्या नवीन संकेतस्थळाचे (www.raigaddistrictcricketassociation.com) तसेच खेळाडूंसाठीच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार रवीशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नवीन संकेतस्थळामुळे जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, पंच, गुणलेखक आणि क्रिकेटप्रेमींना असोसिएशनची सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. संघ निवड समिती, निवडलेले संघ, टीम मॅनेजर यांची माहिती, विविध गटातील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक, रजिस्ट्रेशन प्रक्रिया तसेच जिल्ह्यातील खेळाच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या व्यक्तींची माहिती संकेतस्थळावर पाहता येणार आहे. यामुळे असोसिएशनच्या कामकाजात पारदर्शकता वाढणार असून संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.
अनावरण सोहळ्यात बोलताना आमदार रवीशेठ पाटील यांनी नव्या कमिटीच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “तंत्रज्ञानाचा वापर करून आरडीसीए प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, याचा मला आनंद आहे. नवीन संकेतस्थळ आणि ओळखपत्रांमुळे खेळाडूंना मोठा फायदा होणार असून आगामी काळात असोसिएशनसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”
हे संकेतस्थळ तयार करण्यासाठी ए.जी.सी. इमेजिंग सोल्यूशन्सचे उ.प. चव्हाण व गणेश दिलीप शिंदे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, खजिनदार प्रशांत ओक, कौस्तुभ जोशी, ॲड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, शेखर भगत, किशोर गोसावी, प्रदिप साळवी, रोहित कार्ले, अभिषेक खातू, प्रवीण आंद्रे यांच्या सह क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू व क्रिकेट प्रेमी लोकं उपस्थित होते.
