पनवेल (वार्ताहर) – रायगड जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सक्रिय पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रश्नांवर थेट प्रहार करणारे आणि लोकप्रतिनिधींना हलवून टाकणारे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जात असे. जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांमध्येही काम केले होते.
मुरुड हे त्यांचे मूळ गाव असून, अलिबाग आणि पनवेल ही ठिकाणे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रासाठी निवडली. सक्रिय आणि क्रियाशील पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने रायगडमधील पत्रकार वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
