• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; मासेमारी व प्रवासी बोटी बंद

ByEditor

Aug 18, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रायगडासह उरण परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागले असून सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मासेमारी बोटी समुद्रात जाऊ नयेत, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला असून शेकडो बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. अलीकडेच बंदीकाळात मासेमारीसाठी गेलेली एक बोट बुडाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने सर्व बोटी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय मुंबई–अलिबाग आणि करंजा–रेवस या मार्गांवरील प्रवासी बोट सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

शनिवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जासई येथील सर्व्हिस रस्ता पाण्याखाली गेला असून अनेक ठिकाणी शेतीही पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी उष्णतेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला असला तरी मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!