उरण । अनंत नारंगीकर
उरण परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गव्हाण फाटा रस्त्याच्या मधोमध एक डंपर बंद पडल्याने मोठी कोंडी झाली. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

वाहन बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठा क्लेश सोसावा लागला. या दरम्यान नवी मुंबई, जेएनपीटी बंदर व पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या हजारो नोकरदार व नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत निघालेल्या नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला.
डेब्रिज वाहतुकीवर बंदी असतानाही हा डंपर येथे कसा पोहोचला, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
