धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील धाटाव गावात दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सोनारसिद्ध मंदिरा लगतच्या विसर्जनस्थळावर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा गणरायाचा गजर करत धाटावमधे दीड दिवसाच्या सुमारे ३० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कुटुंबासह विसर्जनस्थळी भाविक दाखल झाले होते.

विसर्जन समयी पावसानेही थोडी उसंत घेतली होती. गावातून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत असंख्य लहान थोर मंडळीसह जेष्ठ नागरिक, महिला वर्गसुद्धा सहभागी झाले होते. अवघी दोन दिवस देवबाप्पाची सेवा करण्यासाठी मिळाल्याने विसर्जन समयी भावपूर्ण निरोप देताना काही चिमुकल्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याचे पहावयास मिळाले.

