• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक! गणपतीच्या दर्शनातून वाद, नऊ जणांकडून आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण

ByEditor

Aug 30, 2025
AI Generated Image

रोहा तालुक्यातील घटना; मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका आदिवासी युवकाने मुरुड तालुक्यातील मुलीच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याच्या रागातून मिठाघर गावातील नऊ जणांनी भालगाव आदिवासी वाडी येथील वाघमारे कुटुंबावर हल्ला करून पाच जणांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास भालगाव येथील मंगेश महादेव वाघमारे व त्यांचा चुलत भाऊ मोबाईल नेटवर्कसाठी रस्त्यावर आले असता ही घटना घडली. दरम्यान वाघमारे यांचा मुलगा सुमित वाघमारे हा मिठाघर येथील दिया दिलीप शहापुरकर हिच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. याचा राग आरोपींनी मनात धरला होता. या रागातून दिपेश कृष्णा ठाकुर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकुर, विराज विजय ठाकुर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनित विजय ठाकुर आणि सागर पांडुरंग ठाकुर (सर्व रा. मिठाघर, ता. मुरुड) यांनी मिळून वाघमारे कुटुंबीयांवर हल्ला केला.

आरोपींनी हाताबुक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर चाकूने वारही करण्यात आला. सागर चंदर वाघमारे (२१) याच्यावर उजव्या पायाच्या पोटरीवर चाकूने वार केला. तसेच साहिल वाघमारे (२१), चंदर श्रावण वाघमारे (६०), संगिता मंगेश वाघमारे (३२), राम चंदर वाघमारे (३५) यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अलिबाग उपविभागीय अधिकारी माया मोरे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यानंतर मुरुड पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५७/२०२५ नोंदविण्यात आला असून भा.दं.वि. कलम ११८(१)(२), ११५(२), १८९(१), १९१(२)(३), १९० तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ (सुधारणा २०१५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी दिपेश कृष्णा ठाकुर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकुर, विराज विजय ठाकुर, करण विठोबा चिपकर आणि सुजय संतोष शहापुरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे करीत आहेत.

हे हि पहा :

वाकण-पाली मार्गावर जंगली पीरच्या मागे पाण्यात आढळला मृतदेह

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!