रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या सासरच्या चौघांविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री बलकवडे ही आपल्या पती, सासरे, सासू, नणंद आणि साडे तीन महिन्यांच्या बालकासह गणेशोत्सवासाठी ठाणे येथून कोर्लई गावी आली होती. २८ ऑगस्ट रोजी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, २९ ऑगस्ट रोजी बालकाला आंघोळ घालण्याच्या वेळी पती समीर बलकवडे यांच्याकडून चुकून बालकाच्या डोळ्यात पाणी गेल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर गेले आणि भाग्यश्री घरात एकटीच राहिली.
काही वेळाने दरवाजा बंद असल्याचे लक्षात आल्यावर तो तोडण्यात आला. आत प्रवेश केल्यानंतर भाग्यश्रीने घराच्या छताच्या पाइपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिला तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मयत भाग्यश्रीच्या आई मंजुळा दत्ता पाटील (वय ५५, रा. ठाणे) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, भाग्यश्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती समीर बलकवडे, सासरे विलास बलकवडे, सासू मीना बलकवडे आणि नणंद वैष्णवी बलकवडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक १०८/२०२५ असून तपास पोलीस उपनिरीक्षक एम. जी. बावकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
भाग्यश्रीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या मंडळींनी अलिबाग जिल्हा रुग्णालय गाठले. तेथे माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद निर्माण झाला होता, मात्र पोलीस कर्मचारी बंड्या राठोड यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा मुरुडचे नायब तहसीलदार जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली.
भाग्यश्री बलकवडे यांचे अंत्यसंस्कार ठाणे येथे त्यांच्या माहेरी करण्यात येणार आहेत.
