मुरुड तालुक्यातील धक्कादायक घटना
मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे वाढते प्रकार
रायगड丨अमुलकुमार जैन
आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासाठी हे साधन उपयोगी असले तरी त्याचे गंभीर नकारात्मक परिणामही समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडली असून यात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
रायगड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली 17 वर्षीय मुलगी राखी (नाव बदललेले) आपल्या कुटुंबासोबत ठाणे जिल्ह्यात शिक्षणासाठी राहत होती. 10 मे 2025 ते 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत तिची ओळख राजेश (नाव बदललेले) या अल्पवयीन मुलाशी इंस्टाग्रामवर झाली. ओळख वाढत गेली आणि राजेशने तिला आपल्या घरी बोलावून घेतले.
तिथे विवाहाचे आश्वासन देत त्याने अल्पवयीन असूनही तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब राजेशचे आई–वडील दिनकर व माया (नावे बदललेली) यांना माहित असूनही त्यांनी मुलाला रोखले नाही, उलट मौन संमती दिल्याचा आरोप आहे.
राजेशकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण त्रासामुळे त्रस्त झालेल्या राखीने थेट मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बी.एन.एस. 2023 कलम 64(1) तसेच पॉक्सो कायदा 2012 कलम 4 व 17 अंतर्गत राजेश आणि त्याचे पालक दिनकर व माया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अविनाश पाटील करीत आहेत.
जिल्ह्यात वाढते प्रकार
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या गृह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत 30 ते 40 प्रकरणे समोर आली असून हा मुद्दा अलीकडील पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी उपस्थित केला होता.
पालकांसाठी धडा
आजकाल अनेक पालक मोठ्या हौसेने मुलांच्या हातात तीस–चाळीस हजार रुपयांचे स्मार्टफोन देतात. पण अल्पवयीन वयात मोबाईल देणे धोकादायक ठरू शकते. अशा वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैराश्य, चिंता, झोपेचा त्रास, भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी तसेच ऑनलाइन संवादांच्या दबावामुळे निर्माण होणारा ताण ही गंभीर समस्या बनली आहे.