रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे बेकायदेशीरपणे विक्री होत असलेली हजारो रुपयांची देशी व विदेशी दारू अलिबाग पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात रुचिता ऊर्फ सारिका रुपेश नागवेकर (वय ४५, रा. शिवलकर नाका, कोळीवाडा, अलिबाग) हिच्याविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलिस ठाण्याचे प्रभाग पोलिस निरीक्षक किशोर साळे यांना शिवलकर नाका परिसरात दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस पथक तयार करून २९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी नागवेकर हिच्या घरासमोर कबुतरखान्याजवळ शासनाची परवानगी नसताना बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
या छाप्यात पोलिसांनी एकूण ७,९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात मॅकडोवेल्स नं.०१ ओरिजनलच्या १० बाटल्या, रॉयलग्रीन सुप्रिम ब्लेंडेड व्हिस्कीच्या ५ बाटल्या, रॉयल चॅलेंज फाईनेस्ट प्रिमिअम व्हिस्कीच्या २ बाटल्या, लंडन पिल्सनर स्टॅग बिअरच्या ५ बाटल्या, टुंबर्ग स्ट्रॉंग बिअरच्या ४ बाटल्या, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरच्या २ बाटल्या व देशी दारू संत्रा जीएमच्या ५० बाटल्यांचा समावेश आहे. या प्रकरणी गु.र. नं. १६३/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.
दरम्यान, रुचिता नागवेकर हिच्यावर २०२३ मध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता तर तिच्या मुलाकडून जून २०२५ मध्ये तब्बल सत्तर हजार रुपये किमतीचा गुटखा व दारू जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी प्रत्यक्ष जप्तीपेक्षा लाखो रुपयांचा मुद्देमाल कमी दाखवण्यात आल्याची चर्चा सध्या शिवलकर नाका व अलिबाग शहरात जोरात सुरू आहे.