उरण । अनंत नारंगीकर
नवी मुंबई परिसरात वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करताना वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यात येत आहे. मात्र, चिर्ले–दिघोडे, गव्हाण फाटा–पाडेघर तसेच खोपटा पूल–धुतूम या मार्गांवरील दररोजची भीषण वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

शनिवारी रात्री या कोंडीचा फटका एका रुग्णवाहिकेला बसला. गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी ही रुग्णवाहिका दिघोडे–चिर्ले रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडली. वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
दररोज हजारो प्रवासी या रस्त्यावर कोंडीच्या त्रासाला सामोरे जात आहेत. अवैध वाहनांची गर्दी, नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे नाकर्तेपण यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. परिणामी गंभीर रुग्णांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग मोकळा ठेवणे, वाहतूक व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करणे आणि प्रभावी नियोजन राबविणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात अशा उपाययोजना होत नसल्याने सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे.
या घटनेनंतर उरण तालुक्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, गटविकास अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करून प्रवाशांना या समस्येतून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे हि पहा
सुकेळी खिंडीतील उतारावर पुन्हा अपघात; केमिकलने भरलेला कंटेनर पलटी