रायगड । अमुलकुमार जैन
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अलिबाग तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर पेण तालुक्यातील २२ वर्षीय तरुणाने वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे.
मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान, आरोपीने पीडित मुलीला तिची बदनामी करण्याची धमकी देत शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला चार महिन्यांची गर्भवती केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पीडितेने २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेगुर्लेकर तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पेण न्यायालयाने त्याला ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत त्यांना गर्भवती करण्याचे प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील महिला आणि पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.