गुंतवणूकदारांना १०–१२ कोटींचा गंडा; अटक झाली पण काही दिवसांतच जामीन
उरण । विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील बोरखार गावात तब्बल १० ते १२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी दिपाली अमित ठाकूर (रा. बोरखार – उरण) हिला न्हावा शेवा पोलीसांनी अटक केली. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे काही दिवसांतच तिला जामिनावर सोडण्यात आले. त्यामुळे “सरकार व प्रशासन आरोपीच्या बाजूने आहे का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंचा गंडा
दिपाली ठाकूर हिने “मर्चंटिंग कंपनी”च्या नावाखाली आणि जसखार येथील कांता जयप्रकाश ठाकूर हिची मुलगी असल्याचा विश्वास संपादन करून अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो-कोटी रुपयांची उकळी केली.
मेघनाथ जनार्दन ठाकूर (रा. जसखार – उरण) यांना तर तिने तीन करार करून लाखो रुपये गुंतवायला लावले. मोठा नफा मिळेल, असे आश्वासन दिले. करारासाठी कौस्तुभ डाकी (बोरखार) याचा बॉण्ड घेतला, तर इतर बिझनेस पार्टनर्सची नावे सांगून विश्वास संपादन केला.
खोटे करार, बाऊन्स चेक आणि फसवणूक
गुंतवणूकदारांच्या मोबदल्यात दिलेले करार व चेक नंतर बोगस ठरले. सर्व चेक बाऊन्स झाले आणि बँक खाती बंद करण्यात आली. दिपालीने मेघनाथ ठाकूर यांना घर-जमीन विकून पैसे परत करीन, असेही सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात कोट्यवधींचा गंडा घातला. पोलिसांसमोरही ती सतत खोटे बोलत राहिली.
तक्रार थांबवण्यासाठी धमक्या
“जर पोलिसांत तक्रार केली, तर पैसे मिळणार नाहीत,” अशा धमक्या देऊन तिने अनेक गुंतवणूकदारांना शांत बसवले. तरीही सात-आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर अखेर न्हावा शेवा पोलिसांनी कारवाई करत दिपालीला अटक केली.
नागरिकांचा आक्रोश
“सामान्य माणसाला छोट्या गुन्ह्यातसुद्धा आठवडे-आठवडे कोठडी भोगावी लागते, पण कोट्यवधींच्या घोटाळ्यानंतर आरोपीला काही दिवसांतच जामीन मिळतो — हा दुहेरी न्याय आहे,” असे नागरिक संतापाने म्हणत आहेत.
सध्या गुंतवणूकदार मोर्चा, निवेदन व न्यायालयीन लढाईसाठी तयारी करत आहेत. दरम्यान, इतर आरोपी — सीताराम थळी (विंधणे) व कांता जयप्रकाश ठाकूर यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आरोपीला लवकर जामीन मिळाल्यामुळे चौकशीवर परिणाम होणार का, हा मोठा प्रश्न कायम आहे.