रायगड | अमुलकुमार जैन
रोहा-मुरूड मार्गावरील भालगाव आदिवासी वाडीत प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून झालेल्या वादात एका युवकावर काठ्यांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी विनीत्य विजय ठाकूर (वय ३१, रा. मिठागर, ता. मुरूड) याला गावातील साहिल शहापूरकर याने माहिती दिली की, त्याच्या नात्यातील दिया शहापूरकर हिचे भालगाव आदिवासी वाडी येथे राहणाऱ्या सुमित वाघमारेसोबत संबंध आहेत. ही बाब खरी आहे का हे विचारण्यासाठी विनीत्य ठाकूर हा साहिल शहापूरकर व त्याचे मित्र यांच्यासह भालगाव येथे गेला.
तेथे त्यांनी साहिल वाघमारे याला या संबंधांबाबत विचारणा केली असता त्याला संताप आला. त्याचा राग अनावर होऊन साहिल वाघमारे याने आपल्या तिघा साथीदारांसोबत मिळून विनीत्य ठाकूरवर हल्ला केला. त्यांनी संगनमत करून त्याच्या गाडीच्या शोवरवर व डोक्यावर काठ्यांनी वार करत त्याला गंभीर दुखापत केली.
फिर्यादीसोबत असलेल्या मित्रांनाही या वेळी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी झालेला विनीत्य ठाकूर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाऊ नामदेव आघाण पुढील तपास करत आहेत.