रायगड । अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात आत्महत्या व खुनांच्या मालिकेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५ घटनांची नोंद झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण खुनाची घटना घडली आहे. अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे राहणाऱ्या अर्चना चंद्रकांत नाईक (वय 36) हिचा शेजारी राहणाऱ्या दत्ताराम नागू पिंगळा या व्यक्तीने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्चना नाईक आणि आरोपी दत्ताराम पिंगळा यांच्यात काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला अर्चनाचे काका तुकाराम सजन्या नाईक यांनी विरोध केला होता. काकांच्या इच्छेनुसार अर्चनाचा विवाह चंद्रकांत अशोक नाईक यांच्याशी लावून दिला गेला. या घटनेचा राग आरोपीच्या मनात इतका प्रखर होता की, २८ मार्च २०१८ रोजी त्याने तुकाराम नाईक यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या तुकाराम यांचे ३१ मार्च २०१८ रोजी जिल्हा रुग्णालयात निधन झाले.
या खुनप्रकरणी दत्ताराम पिंगळा याला अटक करण्यात आली होती आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपी दत्ताराम पिंगळा याच्या मनात वैरभाव अजूनही कायम होता. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास तो दिवीवाडी येथे आला. त्याने अर्चनाला भेटून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यात वाद झाला. वाद चिघळल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात जवळ असलेल्या दोरीच्या सहाय्याने अर्चनाचा गळा आवळून खून केला.
या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी दर्शना किशोर नाईक (वय 39, दिवीवाडी) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध खुनाचा (कलम 302 भादंवि) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्या आणि खुनांच्या घटनांनी उग्र स्वरूप घेतले आहे. फक्त तीन महिन्यांत तब्बल २५ प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
