• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुक्यात धक्कादायक घटना : वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लंपास

ByEditor

Sep 3, 2025

माणगाव । सलीम शेख
माणगावजवळील कुंभे पुनर्वसन वसाहत, भादाव येथे ७४ वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रायगड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताबाई शंकर कांबळे (वय ७४) या भादाव येथील कुंभे पुनर्वसन वसाहतीत राहत होत्या. १ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून ते २ सप्टेंबर सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने घरात घुसून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृत महिलेच्या अंगावरील सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (१० ग्रॅम वजनाची चैन व एक जोड सोन्याच्या बांगड्या) चोरून आरोपी पसार झाला.

या प्रकरणी रामचंद्र बावदाने (रा. उतेखोल) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध कॉ. गु. र. जि. नं. १८२/२०२५ भा. दं. सं. कलम १०३(१), ३११, ३३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हा शाखेचे मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे पुढील तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!