रायगड | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील झिराड येथे गणपती विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली. अनिल बुधा नाईक (वय ४४, रा. झिराड आदिवासी वाडी, ता. अलिबाग) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत आशा अनिल नाईक (वय ४३) यांनी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, मृतदेह तब्बल २४ तासांनंतर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर आळी परिसरातील तलावात अनिल नाईक आपल्या सहकाऱ्यांसह गौरी गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जनानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या शोधासाठी तलाव परिसरात तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी त्यांचा टी-शर्ट आणि चप्पल सापडल्याने तलावात बुडाल्याचा संशय बळावला.
मांडवा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, दुपारपर्यंत मृतदेह न सापडल्याने रोहा येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अखेर बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अनिल नाईक यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून, नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची नोंद मांडवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिद करीत आहेत.
अनिल नाईक यांच्या निधनामुळे झिराड गावासह संपूर्ण अलिबाग तालुक्यात शोककळा पसरली आहे.
