रायगड | अमुलकुमार जैन
मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खेडहून विरारकडे जाणाऱ्या भुसावळ आगाराच्या (गाडी क्रमांक MH-20 BL-3457) एसटी बसमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे शेकडो जीवितहानी टळली.

प्रवासी वर्गाशी केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, चालकाने वेळेवर परिस्थिती ओळखून सर्व प्रवाशांना धोक्याची जाणीव करून दिली आणि सुरक्षितरित्या खाली उतरवले. त्यामुळे भीषण दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसीचे फायर फायटर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच एमआयडीसी पोलिसांनीही तत्परतेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, महाड एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री. फुलपगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करून मुंबईकडे पाठवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिस प्रशासनाच्या तत्परतेमुळे आता वाहतूक सुरळीत झाली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस सूत्रांनी दिली.
