आगामी निवडणुकांसाठी शेकाप सज्ज • पक्षाचे महत्व तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
अलिबाग । अमुलकुमार जैन
शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. मात्र अशा गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मतदान केंद्रस्तरावर काम करून थेट मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतर्फे आपण निवडणुका लढवणार आहोत. जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठ्या जिद्दीने, चिकाटीने व मनात चीड ठेवून वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस व माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा चिटणीस मंडळ व नव्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी (दि. ३) करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी शेकापची ताकद, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली.
ते म्हणाले की, रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची मते आजही ठाम आहेत. साडेचार लाख मते ही आपली खरी ताकद आहे. पुढील काळात वेगळा पॅटर्न घेऊन काम करण्याचा मानस असून प्रत्येक ग्रुप व बुथ स्तरावर मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पक्षाने आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक पदे भरली असून प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी दिली आहे. ही ताकद संघटितपणे वापरली तर विरोधकांना धडकी भरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीला माजी आमदार बाळाराम पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, तसेच तालुका चिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत तालुका चिटणीसांकडून कामाचा आढावा घेण्यात आला. बुथ व घरस्तरावर केलेल्या कामाची माहिती देण्यात आली तर अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.
प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा – बाळाराम पाटील
या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा. तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून जिल्हा रोहापर्यंत स्थिरावणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये बुथ स्तरावर नेटकं व काटेकोर काम करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मत चोरीचा प्रश्न गंभीर आहे. पोलादपूरपासून कर्जत-पालीपर्यंत त्याचे षडयंत्र रचले जाऊ शकते. यावर अंकुश ठेवण्यासाठी मतदार याद्या नीट तपासणे अत्यावश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती केली तरच निवडणूक खरीखुरी व प्रामाणिकपणे लढवता येईल.
जबाबदारीने काम करा –जिल्हा चिटणीस सुरेश खैरे
बैठकीत बोलताना जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगितले की, पक्षाने कार्यकर्त्यांना मोठ्या संधी दिल्या आहेत. महिलांपासून विद्यार्थी, कामगार, शेतकरी, युवक यांचे प्रश्न सोडवले तर शेकापची ताकद दुपटीने वाढेल. रायगड जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते आणि तेथील सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे.
ते म्हणाले की, प्रभाग रचनेचा अभ्यास करून बुथ अध्यक्ष नेमणे, संघटन मजबूत करणे आणि प्रत्येक गावापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणे ही काळाची गरज आहे. पनवेल, अलिबाग, कर्जत, पेण, महाड, खालापूर, उरण, रोहा व माणगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना गद्दारांविरोधात लढण्याचे, जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आणि शेकापची ताकद कायम ठेवण्यासाठी जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटित, सज्ज व सजग राहील, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त झाला.
