• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इनोवा कार चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांचे मोठे यश; राजस्थानातून दोन सराईत चोरटे गजाआड

ByEditor

Sep 4, 2025

चोरीची इनोवा व वापरलेली स्विफ्ट डिजायर जप्त

कर्जत । गणेश पवार
कर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पार्क केलेली दहा लाख रुपयांची इनोवा कार चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कर्जत पोलिसांनी राजस्थानमध्ये यशस्वी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली टोयोटा इनोवा क्रिस्टा (MH-46 BF-0088) तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिजायर (HR-12 AA-6493) अशी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

सद्दाम अशफाक मिस्त्री यांनी त्यांच्या स्पेअर पार्ट शोरूमच्या शेजारी इनोवा कार पार्क करून ठेवली होती. २१ जून २०२५ रोजी अज्ञात चोरट्यांनी कार लंपास केली होती. कर्जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. मात्र, रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने आरोपींची ओळख पटवणे हे तपासपथकासमोर मोठे आव्हान होते.

उपनिरीक्षक राहुल वरोटे व त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न करून कर्जत, नेरळ, चौक, खालापूर, खोपोली परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांविषयी खात्रीशीर माहिती मिळवून पथक राजस्थानमध्ये रवाना झाले. बाडमेर व जालौर जिल्ह्यांमध्ये कसून तपास करून अखेर आरोपींना जेरबंद करण्यात आले.

अटक केलेले आरोपी म्हणजे – ओमप्रकाश सवाईराम बिश्नोई (३४, रा. मोकवा खुर्द, ता. गुडामालानी, जि. बाडमेर) व अशोककुमार ईसराराम बिश्नोई (४७, रा. करडा, ता. रानीवाडा, जि. जालौर). दोन्ही आरोपींवर राजस्थान राज्यात खूनाचा प्रयत्न, फसवणूक, बनावट कागदपत्रे, खंडणी, गंभीर दुखापत, बलात्कार, अंमली पदार्थ विरोधी कायदा अशा गंभीर स्वरूपाचे तब्बल १७ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

३ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी किती गुन्ह्यांचा तपास उघड होतो याकडे लक्ष लागले आहे.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल वरोटे, उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार संतोष खाडे, स्वप्नील येरुनकर, सागर शेवते व विलास घावस यांनी मोलाची कामगिरी केली. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!