मुंबई : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (मोघे) यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात आलेल्या या वृत्तामुळे कलाविश्वासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया मराठे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. रविवारी (31 ऑगस्ट) पहाटे साडेचारच्या सुमारास मीरा रोड येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या सून व अभिनेता शंतनू मोघे यांच्या पत्नी होत.
अभिनेत्री गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर विशेष सक्रिय नव्हत्या. त्यांनी शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी शंतनूसोबतच्या आठवणी शेअर करत केली होती.
प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा गाजलेल्या मराठी मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली. गोड चेहऱ्याबरोबरच नकारात्मक भूमिका साकारत ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांतूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला. शेवटचे त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती मालिका अर्धवट सोडावी लागली होती.
मराठीसह हिंदी मालिका ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ यांमधूनही त्यांनी घराघरात आपली ओळख निर्माण केली होती. अवघ्या 38 व्या वर्षी प्रियाचे असे अकाली जाणे हे कलाविश्वासाठी मोठा धक्का आहे.
