• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तब्बल १८ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका

ByEditor

Sep 3, 2025

मुंबई | मिलिंद माने
अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी याची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर आज (मंगळवार) संध्याकाळी त्याची सुटका करण्यात आली.

सन २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी भरदिवसा झालेल्या खुनाच्या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अनेक वेळा जामिनासाठी प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असून, संबंधित अटी शर्ती मुंबई सत्र न्यायालयाने निश्चित केल्या. त्यानंतर आदेशाची प्रत नागपूर तुरुंगात मिळताच संध्याकाळी गवळीची सुटका करण्यात आली.

सुटका झाल्यानंतर अरुण गवळीला नागपूर कारागृहाच्या मागील दरवाजातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले. तेथून विमानाने तो मुंबईकडे रवाना झाला.

मुंबईतील गुन्हेगारी जगतात गवळीचे नाव गॅंगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होते. नंतर त्याने राजकारणात प्रवेश करून विधानसभेत आमदारकी मिळवली. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जामिनावर सुटका झाल्यानंतर गवळीची अखिल भारतीय सेना या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

गवळीच्या राजकीय हालचालींमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक राजकारणाची समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!