मुंबई : पुढील पिढ्यांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी… नो फ्युएल’ ही मोहीम कठोरपणे राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यानुसार वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना आता इंधन मिळणार नाही.
हा निर्णय परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंमलबजावणी कशी होणार?
सीसीटीव्ही स्कॅनिंग: प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांचे क्रमांक सीसीटीव्हीद्वारे स्कॅन केले जातील.
पीयूसी तपासणी: स्कॅननंतर वाहनाकडे वैध पीयूसी आहे की नाही, याची पडताळणी होईल.
इंधन नाकारले जाईल: वैध पीयूसी नसलेल्या वाहनाला इंधन मिळणार नाही.
जागेवर पीयूसीची सोय: गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपांवरच तात्काळ पीयूसी प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
युनिक आयडी: प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला युनिक आयडी (UID) दिला जाईल, ज्यामुळे त्याची वैधता ऑनलाइन तपासता येईल.
बनावट प्रमाणपत्रांवर कारवाई
बैठकीत बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले. तसेच आगामी काळात वाहन विक्री करणारी शोरूम्स आणि गॅरेजेसमध्येही पीयूसी प्रमाणपत्र मिळेल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयामुळे रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे बंधनकारक होणार असून, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
