मुंबई : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता. त्यानंतर आता हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. येत्या ३-४ दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.
आदिती तटकरेंची माहिती
सप्टेंबर महिना सुरु होऊन १० दिवस उलटून गेले तरीही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती. त्यामुळे महिला चिंतेत होत्या. मात्र, आता हे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. याआधीही त्यांनी एकदा सांगितले होते की, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकर दिला जाईल. त्यानंतर आज हे पैसे दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत.
