वयोमर्यादेत सवलत, शुल्क कपात; नोव्हेंबरमध्ये मैदानी चाचणी तर जानेवारीत लेखी परीक्षा होण्याची शक्यता
मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांसाठी पोलिस भरती जाहीर केली असून यासाठीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भरतीमुळे हजारो उमेदवारांना आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील विविध पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रशिक्षण अकॅडमींसह वैयक्तिक पातळीवर तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
यंदाच्या भरतीत १५ हजारांपेक्षा अधिक पदांसाठी संधी उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून सुमारे १६ लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भरती प्रक्रियेची सुरुवात गणेशोत्सवानंतर केली जाणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु होईल.
भरतीचे टप्पे
- उमेदवारांना प्रथम मैदानी चाचणी द्यावी लागणार असून त्यात किमान ४० टक्के गुण अनिवार्य आहेत.
- त्यानंतर लेखी परीक्षेसाठी एका पदामागे १० उमेदवारांची निवड केली जाईल.
- लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार असून राज्यभरात एकाचवेळी घेण्यात येईल. मात्र मुंबईत ही परीक्षा होणार नाही.
- मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये, तर लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
वयोमर्यादेत सवलत व शुल्क कपात
विशेष म्हणजे, २०२२ व २०२३ मध्ये ज्यांची वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांनाही यंदा अर्जाची संधी देण्यात आली आहे. तसेच अर्ज शुल्कातही कपात करण्यात आली आहे.
त्यामुळे, पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही संधी गमावू नका!

Be to IPS or Norma police