पुण्यातील आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी तयारी
अलिबाग । क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले पंधरा वर्षाखालील मुलींचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर कळंबोली येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. किशोर गोसावी यांच्या स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर हे शिबिर दोन टप्प्यांत (२३ ऑगस्ट व ४ सप्टेंबर) घेण्यात आले होते.
या शिबिरात रायगड जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड झालेल्या एकूण २३ मुलींनी सहभाग नोंदविला. खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षणाचे विशेष धडे देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून नयन कट्टा, विनय पाटील आणि देवदत्त शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
रायगड जिल्ह्याचा पंधरा वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ पुढील आठवड्यात पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तर्फे आयोजित आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा ३५ षटकांच्या एकदिवसीय स्वरूपात असून, सुरुवातीला साखळी फेरीतील सामने खेळवले जातील.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मुलींच्या क्रिकेटच्या प्रगतीवर सातत्याने भर दिला आहे. आगामी हंगामात मुलींसाठी अधिक स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे असोसिएशनकडून जाहीर करण्यात आले. गतवर्षी रायगडच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या संघाने सुपर लीग फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदाही संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल व आगामी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मुलींना शुभेच्छा दिल्या आहेत.