• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भावावर अनैतिक संबंधांचा संशय; लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला

ByEditor

Sep 5, 2025

रोहा तालुक्यातील महादेववाडीतील धक्कादायक घटना – आरोपी अटकेत

रोहा । प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात नात्याला तडा गेलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहा तालुक्यातील महादेववाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सख्या भावावर लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रमेश गुणाजी शिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. कारविणे गावातील शिद कुटुंब गणेशोत्सवासाठी मूळ गावी महादेववाडीत आले होते. त्यावेळी घराच्या ओटीवर बसलेल्या रमेश शिद याच्यावर त्याचा सखा भाऊ लहू गुणाजी शिद (वय ३७) याने लोखंडी सळईने वार केला. पत्नीशी रमेश याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी लहू याला होता.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले. तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती रोहा पोलिस ठाण्यास मिळताच पोलीस निरीक्षक मारुती पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व आरोपीच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. अखेर मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास लहू शिदला अटक करण्यात यश आले.

या प्रकरणी जखमीची पत्नी सुवर्णा लहू शिद हिने पोलिसांत तक्रार नोंदवली असून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे महादेववाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!