नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबई आणि कामोठे परिसरात अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्ये करणाऱ्या कला-साधना सामाजिक संस्थातर्फे यंदा राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कराडी हॉल, कामोठे येथे “राष्ट्रीय परमपूज्य साने गुरुजी पुरस्कार वितरण सोहळा” पार पडला.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून तब्बल ८३० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५० जणांची निवड करण्यात आली. निवड झालेल्यांमध्ये अलिबागचे रहिवासी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबाग शाखेचे सदस्य आणि बहुआयामी साहित्यिक अनंत देवघरकर यांचाही समावेश होता.
पुरस्कारप्राप्तांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल तसेच श्यामची आई आणि सुवर्णपथ ही पुस्तके देऊन गौरविण्यात आले. यावेळी परमपूज्य आदर्श शिक्षक, परमपूज्य सामाजिक भूषण, परमपूज्य जीवनगौरव अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
हा सोहळा पद्मश्री सुप्रसिद्ध ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव, भारत सरकार तर्फे पद्मश्री प्राप्त केलेले दिगंबर तायडे, कॅप्टन मनोज भामरे आणि इतर प्रथितयश मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात साहित्यिक अनंत देवघरकर यांना राष्ट्रीय परमपूज्य साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवघरकर यांनी यापूर्वी अनेक पुरस्कारांची शालाक्रांत परंपरा मिळवली असून त्यांच्या या नव्या यशाबद्दल कोकणासह राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
