• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यातील राजकीय भूकंपाने तापले वातावरण!

ByEditor

Sep 9, 2025

तटकरे कुटुंब म्हणजे चिटर फॅमिली -महेंद्र दळवी

शिवसेना (उबाठा), भाजप आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत कार्यक्रम

रोहा-धाटाव । शशिकांत मोरे
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री पदाच्या वादाची धग अजून शमत नाही तोच रोहा तालुक्यातील धाटाव विभागात झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उ.बा.ठा., भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच हा प्रवेश झाल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

रोहा औद्योगिक वसाहतीतील रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन सभागृहात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तालुक्यातील रोठ बुद्रुक शाखाप्रमुख निलेश वारंगे, भाजप पदाधिकारी राजेश डाके, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य महेंद्र कांबळे, सदस्य हर्षाली कांबळे, सचिन मोरे, मंगेश मोरे यांसह रोहा शहर व तालुक्यातील बोरघर, धाटाव, रोठ बुद्रुक-खुर्द, लाढंर, भातसई, पालेखुर्द, मालसई, आंबेवाडी, विरजोली आदी गावांतील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख अॅड. मनोज कुमार शिंदे, उपतालुकाप्रमुख संदेश मोरे, महिला पदाधिकारी वैभवी भगत, उस्मान रोहेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

“मक्तेदारी मोडीत काढण्याची सुरुवात” – भरत गोगावले

नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना मंत्री भरत गोगावले यांनी, “शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान राखणारी, ताकद देणारी आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे आहोत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आजचा प्रवेश म्हणजे मक्तेदारी मोडीत काढण्याची सुरुवात आहे,” असे ठाम विधान केले.

“तटकरे कुटुंब म्हणजे ‘चिटर फॅमिली’” – महेंद्र दळवी

आमदार महेंद्र दळवी यांनी या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. “आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणारे आणि त्याचे समर्थन करणारे तटकरे कुटुंब जनतेसमोर उघडे पडले आहेत. रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंब म्हणजे ‘चिटर फॅमिली’ आहे. रायगडकर सुज्ञ जनता याचा हिशोब करूनच दाखवेल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच “राष्ट्रवादीला आणि तटकरे कुटुंबाला रायगडकर आता माफ करणार नाहीत. पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत भगवा झेंडा फडकणार हे निश्चित आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांच्या मागण्या

नव्या प्रवेशकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी ठोस मागण्या मांडल्या. निलेश वारंगे यांनी “रोठ बुद्रुक गावाचा विकास व्हावा, एमआयडीसीमध्ये एमपीसीबीचा कायमस्वरूपी अधिकारी असावा आणि प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात,” अशा मागण्या यावेळी मांडल्या.

आगामी निवडणुकांचा रंग बदलणार?

या भव्य पक्षप्रवेशानंतर रोहा तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून आक्रमक तयारी सुरू होईल हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी हा धक्का ठरेल का? हे येणारा काळच ठरवेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!