• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गुणवत्ता तपासणी अहवालासाठी लाचेची मागणी; दोन खासगी महिला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ताब्यात

ByEditor

Sep 9, 2025

रायगड | अमुलकुमार जैन
पतन विभागांतर्गत कामाचा गुणवत्ता अहवाल मिळवण्यासाठी अतिरिक्त रकमेची मागणी करून ती स्वीकारताना दोन खासगी महिलांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपशील

धाकटे शहापूर (ता. अलिबाग) येथे खाडीजवळ पक्क्या रॅम्पचे काम करण्याचे कंत्राट श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांच्या संस्थेला मिळाले होते. या कामासाठी उपठेकेदार असलेल्या तक्रारदाराला दक्षता व गुणनियंत्रण जिल्हा प्रयोगशाळा, माणगाव येथून साहित्य तपासणी अहवाल घ्यावा लागणार होता. शासकीय शुल्क म्हणून १८ हजार रुपये ऑनलाईन भरल्यानंतरही अहवाल न मिळाल्याने तक्रारदाराने कार्यालयात संपर्क साधला.

यावेळी कार्यालयात कार्यरत असलेली खाजगी महिला सोनल संतोष नाडकर (वय २८, रा. कोशिबळे, ता. माणगाव) हिने अहवाल देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १८ हजार रुपये स्वतःसाठी व वरिष्ठ साहेबांसाठी मागितल्याचे तक्रारदाराने सांगितले. या मागणीची तक्रार ४ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

पडताळणी व सापळा

८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या पडताळणीदरम्यान सोनल नाडकर व तिची सहकारी संजना सुरज धाडवे यांनी लाच मागणीची पुष्टी केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपयांवर सौदा ठरल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण सरोदे, निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार हेमंत करकरे, महिला फौजदार सुषमा राऊळ, तसेच पथकातील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळा परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना सोनल नाडकरला रंगेहात पकडण्यात आले. तर संजना धाडवे हिने लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याने तिलाही ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही महिलांविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अलिबाग यांच्याकडून सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!