५० कुटुंबांचा इशारा – “चिता रचून आत्मदहन करू” ; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
धाटाव । शशिकांत मोरे
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, तरी रोहा तालुक्यातील करंजवाडी गावाला अजूनही पक्का रस्ता मिळालेला नाही. ग्रामस्थांची रोजची पायपीट दगडधोंडे आणि चिखलमय रस्त्यांतूनच सुरू असून यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शासन आणि लोकप्रतिनिधींकडून या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. अखेर ग्रामस्थांनी “आम्ही ५० कुटुंबे चित्ता रचून आत्मदहन करू” असा इशारा देत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायत हद्दीतील करंजवाडी येथे धनगर समाजाची वस्ती आहे. या वस्तीला गेल्या अनेक दशके रस्ता नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली, प्रसूतीसाठी गरोदर महिलेला न्यायची वेळ आली, तर आजही डोली करून न्यावे लागते. मुलांना शिक्षणासाठी रोजच्या प्रवासात मोठ्या कसरती कराव्या लागतात. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकरी वर्गालाही मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

ग्रामस्थांनी अनेकदा नेत्यांचे उंबरठे झिजवले; परंतु कोणीही दखल घेतली नाही. अखेर ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष तुषार खरीवले यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. खरीवले यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रोह्यात बोलावून, ग्रामस्थांसोबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुरवड यांना निवेदन दिले.
या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “साधारण २.५ ते ३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ग्रामस्थ उपेक्षित आहेत. करंजवाडीतील महिला व बालक शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना लवकरच भेटून लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त करणार आहोत.”
गावातील महिला ग्रामस्थांनीही तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही गावाला आल्यावर रस्त्याची अवस्था नेहमीच बिकट दिसते. यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, पण रस्ता झालेला नाही. आम्हाला पहिला हक्काचा पक्का रस्ता द्या, हीच आमची मुख्य मागणी आहे.”
करंजवाडीतील ग्रामस्थांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार “आम्ही गावातील ५० कुटुंबे चिता रचून आत्मदहन करू” अशी मानसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवेल, असा इशारा ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत दिला आहे.

