म्हसळा । वैभव कळस
म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत, तर उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांची निवड झाली. या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी त्यांची अधिकृत घोषणा केली.
म्हसळा नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून, पक्षाच्या अंतर्गत समन्वयातून इतर सहकाऱ्यांनाही लोकप्रतिनिधित्व मिळावे यासाठी मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक व उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत व उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांची निवड निश्चित करण्यात आली.
या प्रसंगी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी नगराध्यक्ष असहल कादीरी, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, नगरसेविका सरोज म्हशिलकर, माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, नगरसेवक नासीर मिठागरे, शाहीद जंजीरकर, सलीम बागकर, अजीज बशारत, नौसिन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
