• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव; कार्यकर्त्यांचा जल्लोष

ByEditor

Sep 10, 2025

रायगड । अमुलकुमार जैन
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (ता. 10) झालेल्या निवडणुकीत भाजपचे पराग मेहता यांनी विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर गुलाल उधळत, ढोलताशांच्या गजरात साजरा केला.

एकूण 15 नगरसेवकांच्या मतांपैकी पराग मेहता यांना 9 मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) च्या कल्याणी दबके यांना 5 मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिला. निवडणुकीआधी मोठ्या उलथापालथी झाल्या होत्या, त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. तर नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर अधिकारी उपस्थित होते.

पाली नगरपंचायतीत गेल्या साडेतीन वर्षांत चार वेळा नगराध्यक्ष बदलले आहेत. सदस्यत्व रद्द होणे, राजीनामे, पोटनिवडणुका यामुळे सततच्या राजकीय उलथापालथी होत राहिल्या आहेत. या सर्व गोंधळाचा परिणाम विकासकामांवर झाला असल्याची नाराजी नागरिकांत व्यक्त होत आहे.

नाट्यमय घडामोडी

निवडणुकीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (ता. 9) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनीही पक्षाच्या वतीने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपचे पारडे अधिक जड झाले. मात्र काही नगरसेवक त्या दिवशी “नॉट रिचेबल” असल्याने निकालावर कोणता उलटफेर होईल का, याबाबत चर्चा रंगली होती.

पक्षीय बलाबल

पाली नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून, त्यापैकी 2 सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे 5 नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) चे 5 नगरसेवक, भाजपचे 4 नगरसेवक, तर शेकापचा 1 नगरसेवक असा आकडा आहे.

अपक्ष उमेदवार ते भाजप नगराध्यक्ष

विशेष म्हणजे, पराग मेहता हे मूळचे अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता नगराध्यक्षपदावर त्यांनी बाजी मारली आहे.

महायुतीतच थेट लढत

राज्य आणि केंद्रात भाजप–शिवसेना (शिंदे गट)–राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी महायुती असली, तरी पाली नगरपंचायतीत मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत झाली. अखेर भाजपचे पराग मेहता विजयी झाले आणि नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!